१५ ऑगस्ट विशेष कार्यक्रम
नमस्कार,
दरवर्षी गुरुकुल आश्रम शाळा, उदासा येथे राष्ट्रीय सण १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरे केले जातात.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मागील १२ वर्षांपासून ‘नागपूर ग्रुप ऑफ फ्रेंड्स (माँ ग्रुप)’ यांच्या वतीने १५ ऑगस्टच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमध्ये विविध प्रकारचे खेळ, खाद्यपदार्थांचे स्टॉल, मनोरंजनात्मक उपक्रम तसेच छोट्या-मोठ्या स्पर्धा आणि बौद्धिक खेळांचा समावेश असतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास, उत्साह आणि मनोबल वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी एका महिन्याची निवड करून त्या महिन्यात वाढदिवस असलेल्या इयत्ता १ ली ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांचा सामूहिक वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना सुंदर सजावट करून, केक कापून आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांसह भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला जातो. संगीताच्या तालावर आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा साजरा केला जातो.
संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांनी आणि मनोरंजनात्मक उपक्रमांनी भरलेला असतो. विविध प्रकारच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी आयोजित केली जाते. तसेच दुपारच्या वेळेस सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष आईस्क्रीम पार्टीचे आयोजन केले जाते.
‘माँ ग्रुप’ ही एक सेवाभावी NGO असून, त्यामध्ये सुमारे ३०० ते ४०० स्वयंसेवक कोणतेही पद किंवा मानधनाची अपेक्षा न ठेवता सेवाभावी वृत्तीने कार्य करतात. समाजातील विविध घटकांना एकत्र घेऊन विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम सातत्याने राबविला जातो.
या विशेष कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने सहभागी होतात. दरवर्षी सुमारे २५० ते ३०० पालकांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभते. तसेच निर्मलजी अग्रवाल आणि मित्र परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक खाऊचे वाटप केले जाते.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, मनात आत्मविश्वास आणि जीवनात सकारात्मक मूल्ये निर्माण करण्याच्या या सुंदर उपक्रमासाठी ‘नागपूर ग्रुप ऑफ फ्रेंड्स (माँ ग्रुप)’ यांचे योगदान निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
